कालपासून सुरू झालेल्या 9 दिवसांच्या संचारबंदीला आज दुसर्या दिवशी 100 % प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व मोठ्या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट होता. गस्तीवर असणार्या पोलिस अधिकार्यांच्या गाड्या तेवढ्याच काय ते रस्त्यावर दिसत होत्या. मनपाच्या आरोग्य विभागातर्फे विविध भागात अँटीजन टेस्ट घेतली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज सकाळी तातडीने महिला काम करत असलेल्या विभागाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली आहे.
शहरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या दुसर्या दिवशीही शहरातील मुख्य रस्ते वगळता शहरातील अंतर्गत रस्त्यात वाहनेही दिसत नव्हती एकंदरीत संपूर्ण शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
कोरोना बाधित रुगणाची संख्या शहरात झपाट्याने वाढत चालली होती.एक प्रकारे कोरोनाने शहरावर कहर केला होता. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान कडक स्वरूपाची संचारबंदी शहरात लागू करण्यात आली आहे. काल पहिल्या दिवशी या संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक वाहने पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणार्या टवाळखोरांना चांगलाच चाप बसला आहे.त्याचाच परिणाम आज शहरात सर्वत्र शुकशुकाट होता,सर्व रस्ते निर्माणूष्य होते.ठीक ठिकाणी पोलीसाकडून नाकाबंदी, पेट्रोलिंग पाहायला मिळाली तर प्रत्येक वाहन धारकांची चौकशी करूनच पोलीस वाहनांना सोडत होते, तर अनेक दाट वस्त्यांमध्ये नागरिक स्वतःहून घरातून बाहेर पडले नाही.हे देखील प्रशासनाच्या आव्हानाला मिळालेले यशच म्हणावे लागेल.
वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला कोरोना
पत्रकार आणि छायाचित्रकार यांनी आता सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. एका वृत्त वहिनीच्या कॅमेरामनला कोरोनाची लागण झाल्याचे आज आढळून आले. या पूर्वी देखील बर्याच पत्रकारांना लागण झाली होती. सुदैवाने ते सर्व पुढे निगेटिव्ह आले.
पोलिस आयुक्तांचा शहरावर वॉच
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद काल प्रमाणे आज सकाळ पासूनच शहरातील विविध भागात स्वतः जाऊन संचार बंदीची पाहणी करीत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे क्षेत्रात ते परिस्थिचा आढावा घेताना आज दिसले या वेळी जळगाव टी पॉईंट वर आयुक्त स्वतः पायी चालत बराच वेळ थांबून नाका बंदीचा आढावा घेतला.
कर्मचारी पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा हादरले
एका विभागातील महिला कर्मचार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा हादरले. आज सकाळी तातडीने सदर विभागाचे सॅनिटायझेशन करण्यात आल्याचे समजते.
महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणार्या दोन कर्मचार्यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन्ही विभागांचे सॅनिटायझेशन करण्यात आले. सध्या कमीत कमी कर्मचार्यांवर कामकाज सुरू आहे. मात्र महसूल, सामान्य प्रशासन आवक-जावक यासह अनेक विभागात अत्यावश्यक सेवेसाठी कर्मचार्यांची मोठी उपस्थिती असते. कर्मचार्यांना सुरक्षित अंतर राखूनच कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचारी कॉम्प्युटर,खुर्ची, टेबल सकाळीच सॅनि टाईझ करीत असतात. तरीही काल एका विभागातील महिला कर्मचार्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज अधिकार्यांच्या सूचनेनुसार सदर विभागाचे संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात आले.
पेट्रोल भरण्यासाठी गर्दी
शहरातील खाजगी पेट्रोलपंप बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मोजके पेट्रोलपंप सुरू आहेत.अत्यावश्यक सेवा देणार्या डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय, मनपा क्षेत्रातील कर्मचारी पत्रकार यांनाचा पेट्रोल दिले जात आहे. खाजगी पेट्रोल पंप सुरू नसल्याने सकाळी नोकरीवर जाणार्या या अत्यावश्यक सेवामधील कर्मचारी-अधिकारी यांनी पेट्रोल भरण्यासाठी टीव्ही सेंटर भागातील पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.











